नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात दारूची बाटली न दिल्याने एका मद्यपीने वाईन शॉपवर दगड फेक केल्याची घटना घडली. या घटनेत दुकानातील दारूच्या बाटल्या फुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल चांदणे असे दारू दुकानावर दगड फेक करणा-या संशयिताचे नाव आहे.
याबाबत सोनू ब्रिजेश कनोजिया (कॅनलरोड,जेलरोड) या कामगाराने फिर्याद दिली आहे. कनोजिया जेलरोड येथील कैलास सोसायटीत असलेल्या कॅपिटल वाईन शॉप या दुकानातील कामगार आहे. सोमवारी (दि.१२) सायंकाळी तो सेवा बजावत असतांना ही घटना घडली. संशयिताने दारूदुकानाच्या काऊंटरजवळ येवून दारूची बाटली व ५०० रूपयांची मागणी केली. यावेळी कनोजिया यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडला.
संतप्त संशयिताने कामगारांना शिवीगाळ करीत दगड उचलून हाणून फेकला. हा दगड कामगारांना न लागता दुकानातील काचेच्या शोकेसवर जावून आदळल्याने ५० ते ६० दारूच्या बाटल्या फुटल्या असून संशयिताने दोन स्वॅप मशिनचेही मोठे नुकसान केले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.