नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीने आज सर्व नाशिककरांचे लक्ष वेधले. शांतता रॅलीच्या दुस-या टप्याचा समारोप नाशिक येथे होणार आहे. त्यासाठी आज तपोवन ते शिवस्मारक जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही रॅली निघाली. या रॅलीच्या समारोपानंतर सीबीएस चौकात सभा होणार आहे.
दुपारी या रॅलीची सुरुवात तपोवन, जुना आडगाव नाका, निमाणी, मालेगाव स्टॅण्ड मार्गे निघाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मालेगाव स्टॅण्ड येथे पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील शिवतीर्थ येथे छत्रपती महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही रॅली सीबीएस चौकात पोहचली.
या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरगावहून आलेल्यां वाहनांसाठी तपोवन येथील निलगीरी बाग, गोल्फ क्लब मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार व मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या आवारात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. या रॅलीमार्गावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्यामुळे रस्तेही मोकळे झाले होते.