मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत महायुतीला १७७ जागा अनुकूल असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचा हा दुसरा सर्व्हे आहे. लोकसभेत सपाटून मार खाल्यानंतर विधानसभेसाठी करण्यात आलेला हा सर्व्हे महायुतीला हुरुप वाढवणारा आहे. महायुतीत भाजप, शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजप पाठोपाठ शिंदे व अजित पवार गटाने सर्व्हे सुरु केला आहे.
लोकसभेत ४८ जागांपैकी महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. त्यात भाजपला ९, शिंदे गटाला ७ व अजितदादा पवार गटाला १ जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विधानसभेत हातच्या जागा जाऊ नये यासाठी महायुती कामाला लागली आहे. त्यात गेल्या काही महिन्यात महायुतीच्या सरकारने अनेक घोषणा सुरु केल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.
याअगोदर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षाच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवर अंतिम बैठका सुरु झाल्या आहे. त्या आता जवळपास संपेल. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. तर देवेंद्र फडणवीस हे राखी पौर्णिमेपासून या योजनेला घेऊन या योजनेच्या प्रचारात उतरणार आहे.