इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बहिणींनी आशीर्वाद दिला नाही तर १५०० रुपये खात्यातून परत घेणार असे विधान अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर आता विरोधी पक्षांनी राणा व सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, हा राज्याच्या साध्याभोळ्या महिलांच्या भावनांसोबत खेळ आहे..!
बाई ही घरची लक्ष्मी असते. मत दिलंत तरच पैसे देऊ, नाहीतर दिलेत तेही काढून घेऊ असं म्हणत घरच्या लक्ष्मीला पैश्यांचं आमिष दाखवता? तुमच्या फुटक्या मतांसाठी घरच्या लक्ष्मीला लाच देता? या सरकारला लाज वाटायला हवी. माताभगिनींचा एवढा अपमान राज्यात कधीच झाला नव्हता, तेवढा हे सरकार या घाणेरड्या प्रचारात करतंय. लाडकी लाडकी म्हणत ऊतू चाललेल्या बहिणींवरच्या प्रेमाचा आज भांडाफोड झालाय. ना ह्यांचं बहिणीवर प्रेम आहे, ना ही योजना हे सरकार पुढे सुरू ठेवणार आहे. परक्या भावांचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आलाय.
तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, काय @Devendra_Office @mieknathshinde साहेब आलं ना पोटातलं ओठावर….म्हटलं होतं ना..?मतांवर डोळा ठेवून ‘बक’ध्यान करणाऱ्या लोकांना मताची आली कडकी.. म्हणून वाटते बहीण माझी लाडकी.. पण 1500 रू.ची ओवाळणी परत मागणारी हि सत्तांध माणसं आहेत पक्की बेरकी..!