मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळाप्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून अटकेत असलेल्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला. १५ नोव्हेंबरला हिरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते नाशिकच्या मध्यवर्ती तुरुगांत होते. उद्या सकाळी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येणार आहे.
रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेसाठी १० वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७ कोटी ४६ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. तीन टप्यात घेतलेल्या या कर्ज प्रकरणांमध्ये केवळ दीड कोटीची एकच मालमत्ता तीन वेळा तारण देण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे कर्ज थकबाकीची रक्कम जवळपास ३१ कोटीवर गेली तरी कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने या कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार बँकेने केली. त्यानंतर या प्रकरणी आयाशनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी जामीन मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आता तो मंजूर झाला आहे.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असतांना अद्वय हिरे यांची सुटका झाल्यामुळे मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात आता संघर्ष दिसणार आहे.