नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिक येथील शांतता रॅलीमुळे मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सिटीलिंक बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिटीलिंकच्या व्यवस्थापनाने केले आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने २५० बसेसच्या माध्यमातून नाशिक शहरातील विविध मार्गांवर सार्वजनिक बससेवा पुरविण्यात येते. परंतु मंगळवार १३ ऑगस्ट २०२४ रोजी शहरात काढण्यात येणार्या शांतता रॅलीमुळे ही बससेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात सुरू केलेल्या शांतता रॅलीचा मंगळवारी नाशिकमध्ये समारोप करण्यात येणार आहे. या समारोप कार्यक्रमाअंतर्गत तपोवन, आडगावनाका, निमाणी, पंचवटी कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, मेहेर सिग्नल, सी.बी.एस मार्गे सुमारे ७ किलोमीटरची शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग सकाळी ८ वाजेपासून पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
मुख्य म्हणजे सिटीलिंक बसफेर्यांच्यादृष्टीने देखील हाच मार्ग महत्वपूर्ण असून बहुसंख्य बसेस याच मार्गावरून मार्गस्थ होत असतात. परंतू सदर मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आल्याने मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सिटीलिंकच्या बससेवेवर देखील याचा परिणाम होवून बसेसवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच ऐनवेळी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार सिटीलिंक बसेस मार्गस्थ होतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. सदर प्रवासादरम्यान प्रवाश्यांनी सिटीलिंकला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने करण्यात आले आहे.