नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागात रविवारी दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या एका मद्यपीने व्यावसायीकांना शिवीगाळ व दमदाटी करीत त्याने दुकानांमधील काचेच्या वस्तूंचे नुकसान केले. या घटनेत एका दुकानातील काऊंटर कोयत्याने फोडण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत यशवंत सोनवणे (४८ रा.गणपती मंदिरामागे,महात्मानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत भावेश प्रभुदास पटेल (रा.अर्चित रॉयल अपा.महात्मानगर) या व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. पटेल यांचे महात्मानगर भागातील वल्लभा सोसायटीत सागर किराणा नावाचे दुकान आहे. रविवारी (दि.११) पटेल आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली.
दुपारी दोनच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या संशयिताने कोयत्याचा धाक दाखवित परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी पटेल यांच्या सह अन्य व्यावसायीकांना शिवीगाळ व दमदाटी करीत दुकानातील काचेच्या वस्तूंवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत पटेल याच्या दुकानातील काचेचे काऊंटर धारदार कोयत्याने फोडून संशयिताने नुकसान केले असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.