नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्या समाजातील प्रत्येक गरीबाचे जगणे सुसह्य करणे माझा उद्देश आहे. त्यासाठी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गरिबांना जास्तीत जास्त सुविधा आणि सेवा देण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण गोरगरीब जनतेची सेवा करणे हेच खरे राजकारण आहे असे मला वाटते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित लाभार्थी मेळावा व चष्मे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी आमदार सुधाकर कोहळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपूरला मोतीबिंदूमुक्त करणे हे माझे स्वप्न आहे. त्यादृष्टीने स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेमार्फत नेत्र तपासणीचे अभियान सुरू आहे. ज्येष्ठांना चष्मे वाटप, कर्णयंत्रांचे वाटपही आम्ही करीत आहोत. आतापर्यंत ९०० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम पाय लावून दिले. ५० हजारांहून अधिक हृदयशस्त्रक्रिया केल्या. कोरोना काळात हॉस्पिटल्सला ५०० व्हेंटिलेटर दिले. त्या संकटाच्या काळात १०० कोटी रुपयांचे साहित्य वाटले. रेमिडिसिविर सुद्धा तयार केले. हे सारे करण्यामागे आपल्या शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य करणे हाच उद्देश आहे.’
कमाल टॉकीज चौकात तीन मजली इमारत उभी होत आहे. याठिकाणी अत्यंत माफक दरात एमआरआय, सीटी स्कॅन, डायलिसीस, पॅथॉलॉजी, एक्स-रेची सुविधा असेल. एमआरआय केवळ ८०० रुपयांत आणि सिटी स्कॅन ६०० रुपयांत होईल. याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची पॅथॉलॉजी निर्माण करणार आहे. १२ हजाराच्या पॅथॉलॉजीच्या तपासण्या केवळ २०० रुपयांत शक्य होणार आहे. याठिकाणी एक्स-रे फक्त शंभर रुपयांत आणि डायलिसीस फक्त २०० रुपयांत होऊ शकणार आहे, अशी माहिती देखील ना. श्री. नितीन गडकरी यांनी दिली.
गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी या नक्षलग्रस्त भागात स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या वतीने आदिवासी मुलांसाठी जवळपास १ हजार शाळा आम्ही चालवतो. याठिकाणी १ हजाराहून अधिक शिक्षक व इतर कर्मचारी आणि २५ हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. गेल्या २६ वर्षांपासून हे कार्य अवरित सुरू आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.