मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे येथील मेळाव्यात जात असतांना उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले आहे. त्यांनी तीन व्हिडिओ पोस्ट करत पोलिसांवर टीका केली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, या तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही.
जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही.