येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर येवला दौऱ्याच्या वेळी जेसीबीतून पुष्पवृष्टी करताना पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना एक महिन्याने मृत्यू झाला. कोपरगाव येथे त्याच्यावर उपचार सुरू होते.
मराठा आरक्षणासाठी पहिले उपोषण संपल्यानंतर दरांगे पाटील राज्यभर दौरे करीत होते. येवला येथे सभेसाठी आल्यानंतर त्यांच्यावर जेसीबीतून काही युवकांनी पुष्पवृष्टी केली. त्या वेळी जेसीबीतून पडून चार जण जखमी झाले. त्या सर्वांवर उपचार सुरू होते. त्यातील गोकूळ कदम या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन जणांवर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
येवला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जरांगे यांची नऊ ऑक्टोबरला जाहीर सभा होती. त्या वेळी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबीच्या साह्याने पुष्प उधळण करण्यात येत होती. त्या वेळी गर्दी झाल्याने जेसीबीच्या ऑपरेटरला अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला. जेसीबी मशीनच्या समोरील बकेट खाली झुकली. त्यामुळे बकेटमधून फुले उधळणारे युवक खाली कोसळले.