नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहराचा विकास बघता अनेक मोठ मोठे हॉस्पिटल नाशिकमध्ये येत असून नाशिकची मेडिकल हब म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक हे नक्कीच मेडिकल हब म्हणून विकसित होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
असोसिएशन ऑफ फिजिशियन, नाशिकच्या वतीने रेडीसन ब्लू हॉटेल येथे स्ट्रोक मॅनेजमेंट चर्चासत्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ.निर्मल सुर्या,डॉ.अरविंद शर्मा, डॉ.श्रीपाल शाह, डॉ.समीर पेखळे, डॉ.संजय वराडे, डॉ.पी.विजया, डॉ.किरण तिवारी, डॉ.मनोज गुल्हाने, डॉ.नारायण देवगावकर, डॉ.शैलेश बोंदार्डे, यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मानवाचा इतिहास पाहता आजची बदलती जीवनशैली ही मानवास अतिशय घातक अशी बनलेली आहे. माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा आपल्या जीवनात अतिवापर केल्याने त्याचा मानवास फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत आहे.मानवाची आजची बदलती जीवनशैली मानवाच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासास घातक अशी ठरत आहे.
ते म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अधिक सुविधा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचे श्रम पूर्वी पेक्षा कमी झाल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शहरी भागात याचे प्रमाण अधिक आहे. त्या प्रमाणात ग्रामीण भागात श्रम अधिक असल्याने शहरी नागरिकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य अधिक चांगलं असल्याचे बघावयास मिळत आहे.
ते म्हणाले की, नाशिक शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. नाशिकच नाशिकपण टिकविण्यासाठी पर्यावरण पूरक उद्योगाला आपण प्राधान्य देत आहोत. नाशिककरांचे आरोग्य चांगलं राहावे यासाठी नाशिक शहरातील सर्व जॉगिंग ट्रकवर ग्रीन जिम विकसित करण्यात आले असून नागरिकही त्याचा चांगला उपयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे येत आहे. याला कुठेतरी पायबंद घालणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये फास्ट फूड मुळे स्थूलपणा निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक शाळांमधून फास्ट फूडवर बंदी घालण्यात आली आहे. आजची पिढी अतिशय कमी वयातच मधुमेह, रक्तदाब अशा आजाराला बळी पडलेली आपल्याला दिसत आहेत.
कुठल्याही नागरिकाने वेळेच्या आत योग्य उपचार घेतल्यास त्याचा जीव नक्कीच वाचू शकतो. त्यामुळे लक्षण दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.