नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भावावर पोलीसात दाखल केलेली तक्रार मागे घे या कारणातून तिन जणांच्या टोळक्याने एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना सातपूर कॉलनीतील रायगड चौकात घडली. या घटनेत युवकावर धारदार वस्तूने वार करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा भारस्कर व त्याचे दोन साथीदार अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत दर्शन पांडूरंग मोरे (१९ रा.एमएचबी कॉलनी,सातपूर कॉलनी) या युवकाने फिर्याद दिली आहे. मोरे गुरूवारी (दि.८) रात्री आपल्या घरी असतांना त्यास संशयित भारस्कर याने फोन करून परिसरातील देवी मंदिर भागात बोलावले. या ठिकाणी भारस्कर याने भाऊ शुभम भारस्कर याच्या विरोधात पोलीसात केलेली केस मागे घे असे सांगितले. मात्र मोरे याने केस मागे घेण्यास नकार दिल्याने संतप्त तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्रिकुटाने लाथाबुक्यांनी मारहाण करीत एकाने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
बंद कारखान्याचे शटर तोडून चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बंद कारखान्याचे शटर तोडून चोरट्यांनी दोन मोबाईलसह कॉपर पाईप चोरून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील यशदीप इंडस्ट्रीज याकारखान्यात घडली. या घटनेत २७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला असून याप्रकरणी अंबड पोलीसांनी एकास अटक केली आहे.
यश बबन ससे (२२ रा.घरकुल योजना चुंचाळे शिवार) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत प्रदिप रमेश बोरसे (रा.प्रशांतनगर,पाथर्डीफाटा ) यांनी फिर्याद दिली आहे. बोरसे यांचा एमआयडीसीतील प्लॉट नं. एच १२६ मध्ये यशदिप इंडस्ट्रीज नावाचा कारखाना आहे. शनिवारी (दि.३) साप्ताहिक सुट्टी निमित्त कारखाना बंद असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री शटर तोडून कारखान्यातील कॉपर पाईप व कामगारांचे दोन मोबाईल असा सुमारे २७ हजाराचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत तक्रार दाखल होताच अंबड पोलीसांना सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून संशयितास बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.