नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम साईटवरील एका मोठ्या खड्ड्यात पाण्यात पोहतांना दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी सातपूर पोलिांनी मुंदडा कंन्स्ट्रक्शनवर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सातपूर भागातील शिवाजीनगर, कार्बन नाका परिसरातील गुरुद्वारा जवळ बांधकाम साईटवरील एका मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पोहतांना ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तिस-या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनोद एकनाथ सोनटक्के, यांच्या फिर्यादी वरून सातपुर पोलिसांनी मुंदडा कंन्स्ट्रक्शनवर कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहळदे हे पुढील तपास करीत आहेत. मनपा अधिकारी व बांधकाम व्यावसायिकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.