नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैव-संवर्धनयुक्त १०९ वाणांचे लोकार्पण करतील. यावेळी पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधतील.
पंतप्रधान ६१ पिकांच्या १०९ जातींचे लोकार्पण करतील, ज्यामध्ये ३४ शेतीची पिके आणि २७ बागायती पिकांचा समावेश असेल. शेतीच्या पिकांमध्ये भरड धान्ये, गवत वर्गातील पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तंतुमय पिके, चांगले उत्पादन देणाऱ्या इतर पिकांसह विविध तृणधान्यांच्या बियाण्याचे पंतप्रधान यावेळी लोकार्पण करतील. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाज्या, लागवडीची पिके, कंद वर्गातील पिके, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींचे लोकार्पण केले जाईल.
पंतप्रधानांनी नेहमीच शाश्वत शेती आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन दिले आहे. भारताला कुपोषण मुक्त करण्यासाठी, पंतप्रधानांनी पिकांच्या जैवसंवर्धनयुक्त प्रजातींना सरकारच्या माध्यान्ह भोजन, अंगणवाडी यांसारख्या अनेक कार्यक्रमांशी जोडून या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले होतील, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या १०९ वाणांचे लोकार्पण म्हणजे, त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.