मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता नावाची चर्चा सुरु आहे. यातील एक जागा भाजपकडे तर दुसरी जागा ही राष्ट्रवादी अजित पवारांना मिळाली आहे. भाजपकडून जवळपास माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर ऱाष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार बाबा सिद्दीकी व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नाना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी रावासाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्याक मते वळवण्यासाठी बाबा सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नाना पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यात तूर्त थांबून विधानसभेचे गणित जुळवण्याचा दोन्ही पक्षांचे धोरण आहे.
यांच्या जागा रिक्त
राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कार्यकाळ दिनांक ५ एप्रिल २०२६ आणि राज्यसभा खासदार पियूष वेदप्रकाश गोयल यांचा कार्यकाल ४ जुलै २०२८ असा आहे. तथापि, १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत श्री.भोसले आणि श्री.गोयल विजयी झाल्याने राज्यसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार, २१ ऑगस्ट २०२४ तर गुरूवार, २२ ऑगस्ट २०२४ ला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ अशी असून मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ ला सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होईल.