नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. बजरंगवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद नंदू पवार उर्फ पश्या पवार (२१, रा. महादेव मंदिराजवळ,बजरंगवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पश्या पवार याच्या गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्यासाठी पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून दोन वर्षांसाठी त्यास तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.८) तो आपल्या घरात मिळून आला. याबाबत अंमलदार समीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.
वीज कंपनीच्या रोहित्रातील १९० लिटर ऑईल चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वीज कंपनीच्या रोहित्रातील सुमारे १९ हजार रूपये किमतीचे १९० लिटर ऑईल चोरट्यानी चोरून नेले. ही घटना पेठरोडवरील राऊ हॉटेल भागात घडली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनिष्ठ अभियंता केतन देवरे (रा.वनश्री कॉलनी,अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राऊ हॉटेल परिसरात कनिष्ठ अभियंता महावितरणचा मखमलाबाद कक्ष आहे. या कार्यालयाच्या आवारात असलेल्या ट्रान्सफार्मरमधील आॅईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून अधिक तपास हवालदार ढुमणे करीत आहेत.