नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात असून सिडको आणि नाशिकरोड भागात झालेल्या चार घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाडा भागात राहणारे निळकंठ गंगाधर विरगावकर (रा.पदमश्री प्लाझा अभियंतानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विरगावकर कुटुंबिय गेल्या १८ जुलै ते ६ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले सुमारे ५४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले.
दुसरी घटना सिडकोतील गणेश चौक भागात घडली. कल्पेश नरेंद्र मगरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मगरे कुटुंबिय गेल्या २७ जुलै ते ६ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत व हवालदार शेख करीत आहेत.
तिसरी घटना शेवगेदारणा ता.जि.नाशिक येथे घडली. शिवाजी दत्तात्रेय कासार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कासार कुटूंबिय गेल्या गुरूवारी (दि.१) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व पैश्यांचा गल्ला असा सुमारे १ लाख १ हजाराचा ऐवज चोरून नेला. तर चेहडी पंपीग भागातील प्रकाश उत्तम थोरात (रा.भगवा चौक संगमेश्वर नगर,जूना पंपीगरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार थोरात कुटुंबिय मंगळवारी (दि.६) रात्री नातेवाईकांकडे गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली सुमारे दोन लाख रूपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.