इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) C-428 या नौकेने ९ ऑगस्टच्या पहाटे राबवलेल्या जलद वैद्यकीय बचाव मोहिमेत (एमईडीईव्हीएसी) पोर्ट ब्लेअर जवळच्या मार्शल बेटावरून फिलीपिन्सच्या एमव्ही ऑलिंपिया जीआर या जहाजावरील ३९ वर्षीय कर्मचार्याला तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी पोर्ट ब्लेअर येथे हलवले. हे जहाज हल्दिया येथून इंडोनेशियाकडे अंदमान आणि निकोबार बेटांजवळून मार्गक्रमण करत होते. त्यावेळी इंजिन रूम मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या डाव्या हाताचा अंगठा यंत्रामध्ये सापडला. या जहाजाच्या कप्तानाने आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी ८ ऑगस्ट रोजी पोर्ट ब्लेअर येथील सागरी बचाव समन्वय केंद्राशी (एमआरसीसी) संपर्क साधला.
ही माहिती मिळाल्यावर, एमआरसीसी पोर्ट ब्लेअरने तात्काळ कारवाई केली आणि जहाजाला पोर्ट ब्लेअरच्या दिशेने जाण्याची सूचना दिली. दरम्यान, एमआरसीसी ने पोर्ट ब्लेअर येथील आयसीजी च्या जहाज आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या शोध आणि बचाव पथकांना एमईडीईव्हीएसी साठी सज्ज राहण्याचा इशारा दिला. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअर इथून C-428 हे जहाज एमईडीईव्हीएसी साठी पाठवण्यात आले. या जहाजाने पोर्ट ब्लेअर जवळच्या समुद्रातील एमव्ही ऑलिंपिया जीआर या जहाजावरील रुग्णाला बाहेर काढले आणि त्याच दिवशी सकाळी त्याला पोर्ट ब्लेअर येथे आणले. त्यानंतर त्याला पोर्ट ब्लेअर येथील जी.बी.पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वेळेवर राबवलेल्या या वैद्यकीय बचाव मोहिमेमधून भारतीय तटरक्षक दलाची, खोल समुद्रात संकटात सापडलेल्या नाविकांना मदत करण्यासाठी असलेली वचनबद्धता अधोरेखित होते.