येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. आणि आज येवला जगभरात पोहचला आहे. त्यामुळे येवल्याच्या झालेला सर्वांगीण विकास कुणीही नाकारू शकत नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. तर विकासाला जात, पात, धर्म काहीही नसत,आपण विकासासाठी मतदारसंघात आलो आणि विकास करत राहणार असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित येवला माऊली लॉन्स येवला येथे विणकर मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, किसनकाका धनगे, संध्या पगारे, युवक शहराध्यक्ष दिपक लोणारी, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, राजेश भांडगे, गोरख शेंद्रे, गणपत कांदळकर, रवींद्र पवार, मोहन शेलार,संध्या पगारे,बंडू क्षीरसागर, विजय पाटील, अरुण पाटील, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, धनराज पालवे, मच्छिंद्र थोरात, निसार शेख, मुस्ताक शेख, लक्ष्मण कदम, मनोज दिवटे,कैलास पाटील, अल्केश कासलीवाल,प्रा.ज्ञानेश्वर दराडे, प्रवीण पहिलवान, श्रीनिवास सोनी, सुनील लक्कडकोट, श्रीकांत खंदारे,देविदास शेळके, जगनराव जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व विणकर बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, रघुजी नाईक सरदार यांनी येवल्याची स्थापना केली. त्या येवल्याची महाराष्ट्रातील बनारस अशी ओळख आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. आणि आज येवला जगभरात पोहचला आहे. त्यामुळे येवल्याच्या झालेला सर्वांगीण विकास कुणीही नाकारू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, विणकर बांधवांनी येवल्याचे वैभव अधिक वाढवले आहे. त्याबद्दल त्याचा सन्मान करतो. आज येवल्याची पैठणी राजकीय लोकांनी देखील अधिक जवळ केली असून निवडणुकीतून काही लोकांनी पैठणी वाटप केल्याच्या चर्चा नाशिक जिल्ह्यात आहे. त्या पैठण्या खऱ्या की खोट्या याबद्दल सांगता येणार नाही अशी मिश्किल टीपणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण सत्तेत सहभागी झालो. सत्तेत सहभागी झालो असताना छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार आपण कदापिही सोडणार नाही. राज्याच्या विकासासाठी सत्तेत सहभागी झालो. येवला मतदारसंघात १६६० कोटी रुपयांची कामे झाली. तसेच दहा हजार कोटी रुपयांची कामे नाशिक जिल्ह्यात झाले. सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे जनतेसाठी हजारो कोटी रुपयांची काम आपल्याला करता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सत्तेत सहभागी झालो म्हणून राज्यातील महिला भगिनिंसाठी लाडली बहीण योजना आणू शकलो. तसेच शेतकऱ्यांना वीज माफी, मुलींना मोफत शिक्षण, युवकांना स्टाय पेंड सारख्या विविध योजना आणता आल्या. या योजनांच्या लाभातून बळ देण्यासाठी आपण करतोय असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, यंत्राचा विकास अधिक होत असल्याने पारंपरिक वस्त्रउद्योग अडचणीत आला आहे. विणकर बांधवांचे अनेक प्रश्न आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अर्थ संकल्पाचा माध्यमातून वस्त्रोद्योग विभागामध्ये भरीव तरतूद आपण केले आहे. २५ हजार कोटी रुपयांचे वस्त्र धोरण आपण स्वीकारलं असून यातून ५ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. अजूनही काही विणकरांच्या मागण्या आहेत. विणकरांच्या मगण्या सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल.
ते म्हणाले की, नाशिकला पिण्याच्या पाण्यासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊन लवकरच किकवी धरणाची उभारणी केली जाईल. आचारसंहिता लगायाच्या आत नार पार ही महत्वपूर्ण योजना मंजूर करण्यात येणार तसेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. यासाठी हजार कोटी रुपयांची योजना आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून हे प्रकल्प आम्ही मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवल्याची पैठणी जगप्रसिद्ध आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तिभूमी तसेच सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी म्हणून येवला प्रसिद्ध आहे. पैठणीचा इतिहास हा अतिशय जुना असून एक महावस्त्र म्हणून पैठणीची ओळख आहे. या पैठणीला २६०० वर्षापूर्वीची ओळख आहे. ही वस्त्र कला आजही तितकीच टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शेतीनंतर जर कुठला व्यवसाय असेल तर विणकर व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे औद्योगिक चालना मिळते. या विणकर व्यवसायाच्या अनेक मागण्या आहे. त्या मागण्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. या येवल्यात सन २००४ साली ४ दुकाने होती आज ४०० हून अधिक आहे. पैठणीच्या या विकासामध्ये येथे निर्माण झालेल्या या पायाभूत सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवल्यात मुक्ती भूमी, बोट क्लब, नाट्यगृह यासह विविध विकासकामे करण्यात आली असून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प चार एकर साकारण्यात येत आहे. लवकरच येवला नाशिक रस्त्याच्या ५६० कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात होणार आहे. मांजरपाडा सारखा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे आहे. पावणेतीनशे कोटी रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात येत असून लवकरच डोंगरगाव पर्यंत पाणी पोहचेल. तसेच राजापूर, धुळगाव सह विविध पाणी योजनांचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवला मतदारसंघात विकासाचा ध्यास घेऊन आपण कामास सुरुवात केली. विकास हा सर्वांसाठी असून विकास हाच आपला श्वास आहे. त्यादृष्टीने हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण मतदारसंघात केलेली आहे. त्यामध्ये प्रशासकीय संकुल, रुग्णालय, स्मारके यासह अनेक विकासकामे झाल्याने येवल्याचे नाव आज जगभरात जात असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकरांचा सन्मान
येवला येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकर शांतीलाल, दिगंबर भांडगे, राजेश भांडगे, रमेशसिंग परदेशी, बाळकृष्ण कापसे यांच्यासह विणकरांचा सन्मान करण्यात आला.