इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे.
या यात्रेबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय आणि महाराष्ट्राविरुद्ध रचण्यात आलेला कट लोकांसमोर आणण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलन छेडून स्वातंत्र्य लढ्याला गती दिली. आजच आदिवासी दिनही आहे. या दिवसाचे महत्व जाणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानी नतमस्तक होत आम्ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली.
फसवेगिरी, गद्दारी करणाऱ्या लोकांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनता कायम उभी ठाकली आहे, हा इतिहास आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना संपूर्ण पाठिंबा देत लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली. पवार साहेबांनी केलेला चमत्कार सर्वांनी पाहिला.महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी, दलबदलू लोकांचा विरोध करण्यासाठी, महाराष्ट्रातलं राजकारण दूषित करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्त देण्यासाठी आपली ही यात्रा आहे. महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकजुटीने यात सहभागी आहेत.
येणाऱ्या काळात आपल्या समोर अनेक प्रलोभने ठेवली जातील. पैशांचा पाऊस पडेल मात्र आपण सत्याच्या बाजूने उभे राहायचे आहे. योजना सुरू ठेवायच्या असतील तर आम्हाला निवडून द्या असे आमिष दिले जाईल, मात्र आम्ही निवडून आलो तर ह्याच योजना अधिक विचारपूर्वक अंमलात आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.