नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेजा-यांमधील पूर्ववैमनस्यांतून दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिल्या घटनेत घरात घुसून बापलेकींनी दांम्पत्यास मारहाण करीत पत्नीचा विनयभंग करण्यात आला तर दुस-या घटनेत पाच जणांच्या टोळक्याने घरातील मारहाण करीत अनोळखी इसमाने महिलेचा विनयभंग केला. या घटनेत महिलेच्या गळयातील सोन्याची पोत तोडून घरात सामानाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्र्यंबकरोडवरील फॉरेस्ट कॉलनीत राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मण जठीराम खाडे, मुलगी विद्या खाडे व तिची बहिण आदींनी गुरूवारी (दि. ८) सायंकाळी बेकायदा घरात प्रवेश करून पूर्ववैमनस्यातून दांम्पत्यास मारहाण केली. या घटनेत महिलेचा विनयभंग करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार मोरे करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार रितीक्षा गाडे, संतोष गाडे, भारती गाडे, ज्योती गाडे व अहिरे नामक अनोळखी इसमाने मंगळवारी (दि.६) रात्री महिलेच्या घरात प्रवेश करून विनाकारण शिवीगाळ करीत महिलेस मारहाण केली. यावेळी दोघा पुरूषांनी महिलेचा विनयभंग करीत तिच्या गळयातील सोन्याची पोत तोडून तसेच घरातील सामानाची तोडफोड करीत नुकसान केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे करीत आहेत.