इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इराकच्या संसदेत एका विधेयकाला सर्वत्र विरोध होत आहे. हे विधेयक लग्नाच्या बाबतीत असून त्यामुळे जगभर त्यावर संतापही व्यक्त केला जात आहे. या विधेयकात मुलींचे लग्नाचे वय आणखी ९ वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या विधेयकावरुन वाद निर्माण झाला आहे. सध्या इराकमध्ये मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षे आहे. पण जर इराकच्या संसदेत विधेयक मंजूर झाले तर मुलींचे वय हे ९ वर्षावर येणार आहे. अशा परिस्थितीत मुलींना १५ वर्षाच्या मुलासोबत विवाह करावा लागणार आहे. यामुळे देशात पुन्हा बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आजही अनेक ठिकाणी कमी वयात मुलींचे लग्न लावून दिले जाते. पण, त्याला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे सरकारच आता कायदेशीर मान्यता देणार असेल तर त्यातून अनेक समस्या निर्माण होणार आहे. अगोदर बालविवाहाची प्रथा होती. पण, त्याला हळूहळू विरोध होऊ लागल्यानंतर ते बंद झाले. पण, आता ते इराक सुरु करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे मानवधिकार संघटनांनी विरोध केला आहे.
कमी वयात लग्न केल्यानंतर शिक्षण, आरोग्य आणि कल्याणावर निर्बंध येतील. अकाली गर्भधारणा आणि घरगुती हिंसाचार देखील वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. युनिसेफच्या अहवालानुसार इराकमध्ये २८ टक्के मुलींचे लग्न १८ वर्षाच्या आधी होतात. आता त्याला कायदेशीर मान्यता दिली तर ते १०० टक्के होईल.