इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल तैनात असते. सीमेवर कुंपणही घातले जाते; परंतु आता भारत आणि बांगला देशाच्या सीमेवर सीमा सुरक्षा दल गुरांच्या तस्करीसह अन्य गुन्हे रोखण्यासाठी एक वेगळा प्रयोग करणार आहे. भारताचे सीमा सुरक्षा दल आता भारत-बांगला देशाच्या सीमेवर मधमाशांचे पालन करणार आहे. सीमेवर मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीचा सीमा सुरक्षा दलाचा प्रयत्न आहे.
भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या ३२ व्या बटालियन मार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारत आणि बांगला देशात तब्बल ४,०९६ किलोमीटर लांबीची सीमा आहे. यातील २,२१७ किलोमीटर लांबीची सीमा पश्चिम बंगालला लागून आहे. या दोन्ही देशांच्या सीमेवर मधमाशांचे पालन करण्याच्या योजनेमध्ये आयुष मंत्रालय सामील झाले आहे. आयुष मंत्रालयाने भारतीय सीमा सुरक्षा दलाला मधमाशांचे पोळे आणि मिश्र धातूंनी तयार केलेल्या स्मार्ट तारांच्या जाळ्याही दिल्या आहेत. मधमाशा कशा पाळायच्या याचे तंत्रज्ञानही सीमा सुरक्षा दलाने दिले आहे.
ही संकल्पना प्रत्यक्षात राबविणारे ३२ व्या बटालियनचे कमाडंट सुजीत कुमार यांनी सांगितले, की केंद्र सरकारने वायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम (व्हीव्हीपी) अंतर्गत ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाने फुलांची रोपे मागितली आहेत. मधमाशांच्या पोळ्यांशेजारी ही फुलझाडे लावण्याची योजना आहे. त्यामुळे मधमाशांना मोठ्या प्रमाणावर परागकण गोळा करून मध तयार करता येईल. तस्करी रोखण्यासाठी मधमाशांचा वापर केला जात आहे.