इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुती सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या महत्वाकांशी योजनेला महाराष्ट्रातील माता-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत १ कोटी ४१ लाख ९८ हजार ८९८ महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे.प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरु असुन आतापर्यंत १ कोटी ३० लाख २९ हजार ९८० अर्ज पात्र झाले असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून १६ व १७ ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे.
ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत. ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये ही विनंती.