नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
देवळाली कॅम्प येथील अनिल मोहन लहारी (४० रा.शनिमंदिरामागे,सौभाग्यनगर) यांनी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. संत कृपा हॉस्पिटल मार्फत पत्नी पुजा लहारी यांनी त्यांना बुधवारी (दि.७) सकाळी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. गणेश वाळोले यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना बेलतगव्हाण ता.जि.नाशिक येथे घडली. धनश्री ऋषीकेश गायकवाड (२८) या महिलेने गेल्या २८ जुलै रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. वडिल दिलीप वाघ यांनी जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.७) वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
 
			








