मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सीमाशुल्क विभाग-III च्या विमानतळ आयुक्तालय अधिकाऱ्यांनी 28 जुलै ते 07 ऑगस्ट 2024 या कालावधीत तस्करीच्या एकंदर 14 प्रकरणांमध्ये 4.66 किलो सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा एकूण 4.00 कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. मेणात लपवलेली सोन्याची भुकटी, कच्च्या स्वरूपातील दागिने, कपड्यांमध्ये, स्पीकर्समध्ये, कपड्यांच्या दोन घड्यांमध्ये, शरीरावर लपवलेल्या सोन्याच्या पट्ट्या आणि व्यक्तींच्या अंगावर घातलेले सोने अशा स्वरुपात या सोन्याची तस्करी करण्यात येत होती.
गुजरातमध्ये सुरत येथे राहणारा एक भारतीय नागरिक एअर इंडियाच्या एआय-984 या विमानाने दुबईहून मुंबईला आल्यावर त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे अशुद्ध स्वरूपातील 22 कॅरेट सोन्याचे एकूण 974.000 ग्रॅम वजनाचे कंगन (4 तुकडे) अंगावर लपवलेले आढळून आले. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली.
दुबईहून 07, अबुधाबी येथून 02, दोहा येथून 01 तर शारजाहून 02 अशा विविध ठिकाणांहून मुंबईत आलेल्या एकंदर 12 भारतीय नागरिकांना विमानतळावर थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे 24 कॅरेट सोन्याची भुकटी, सोन्याचे दागिने तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू असे एकूण 3182.00 ग्रॅम वजनाचे सामान कपड्यांच्या दोन घड्यांमध्ये, बॅगांमध्ये आणि अंगावर लपवून आणल्याचे निदर्शनाला आले.
कौलालंपूरहून आलेल्या एका परदेशी नागरिकाकडे 24 कॅरेट कच्च्या सोन्याचे 1 कडे, आणि एक साखळी आढळून आली.या सर्व वस्तूंचे एकूण वजन 504.00 ग्रॅम असून त्याने अंगावर लपवून या वस्तू आणल्या होत्या.