इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर – लाच घेतांना कारवाई झाल्यानंतर त्या आरोपीच्या मालमत्तेचा शोध घेतल्यानंतर कोटयवधीची मालमत्ता समोर येत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. आता अहमदनगरच्या १ कोटी लाच घेणा-या दोन अधिका-यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेतला जात आहे.
औरंगाबादच्या ठेकेदाराकडून ही लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमिक गायकवाड आणि गणेश वाघ या दोन अभियंत्यांवर लाच प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणात गायकवाड याला रंगेहात पकडण्यात आले. तर वाघ मात्र अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. वाघ याने कारवाई झाल्याचे कळताच मोबाईल बंद केला. त्यानंतर तो पुणेमार्गे फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आता त्याच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे येथील घरावर छापे टाकले आहेत. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहे.
तपासणी पथकाने वाघ आणि गायकवाड यांच्या सध्याच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या मूळ गावी छापे टाकले आहेत. गायकवाड याचे मूळ गाव राहुरी तालुक्यातील चिंचोली हे आहे. त्याच्या गावातील घरी पथकाने छापा टाकला. मात्र पोलिसांना काहीही माहिती मिळाली नाही. वाघ याच्या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र तिथेही काही मिळाले नाही. एमआयडीसीत स्थापत्य अभियंता असलेल्या या अधिकाऱ्यांनी जमवलेली बेहिशेबी मालमत्ता शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वाघ याची पुणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे येथील घरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केली आहेत.