इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने स्पेनला पराभूत करत कांस्य पदक जिंकले. हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात भारतीय संघाने स्पेनवर २-१ अशा फरकाने हा विजय मिळवला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत याने झटपट २ गोल करत भारताला बरोबरी आणि आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. भारताच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी टीमचे अभिनंदन केलं आहे.
नीता अंबानी, IOC सदस्या आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा म्हणाल्या, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमचा दृढनिश्चय, अथक परिश्रम आणि अथक वृत्तीने भारतीय हॉकीचा समृद्ध वारसा आणि ऑलिंपिकमध्ये पुनरुज्जीवन केले आहे. एक गौरवशाली भविष्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तुमच्या कष्टाने मिळवलेले यश साजरे करण्यात संपूर्ण देश सामील झाला आहे, आणि आम्ही तुम्हाला पुढील वर्षांमध्ये आणखी उंचीवर पोहोचण्यासाठी उत्सुक आहोत!”
भारतीय संघाने पॅरिसमध्येही सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवले आहे. भारताने या विजयासह आपल्या मोहिमेचा शानदार शेवट केला आहे. तसेच गोलकीपर पीआर श्रीजेश याला पदकासह निरोप दिला आहे. पीआर श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर हॉकी टीमचं अभिनंदन केलं जात आहे. इंडिया आणि स्पेन दोन्ही संघांसाठी त्यांच्या कर्णधारांनीच गोल केले.