नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) 2013-14 मधील 38 कोटी लिटरवरून 2020-21 मध्ये 302.3 कोटी लिटरवर पोहोचले आहे. मिश्रणाच्या टक्केवारीत 1.53% वरून 8.17% अशी वाढ झाली आहे.या कालावधीत पेट्रोलचा वापरही जवळपास 64% वाढला. इंधन दर्जाच्या इथेनॉलचे उत्पादन आणि तेल विपणन कंपन्यांना त्याचा पुरवठा यात इथेनॉल पुरवठा वर्ष 2013-14 ते इथेनॉल पुरवठा वर्ष 2020-21 या काळात 7 पट वाढ झाली. या यशामुळे प्रोत्साहित होऊन सरकारने 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य 2030 ऐवजी इथेनॉल पुरवठा वर्ष 2025-26 पर्यंत असे आधीच गाठण्याचा निर्धार केला आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित लक्ष्याच्या पाच महिनेपूर्वीच म्हणजे जून 2022 मध्येच साध्य केले आहे. पेट्रोलसह इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण आणखी वाढून इथेनॉल पुरवठा वर्ष 2022-23 मध्ये 500 कोटी लिटरहून अधिक झाले आहे. टक्केवारीतली वाढ 12.06% झाली आहे. चालू इथेनॉल पुरवठा वर्ष 2023-24 मध्ये मिश्रणाच्या टक्केवारीने 13% प्रमाण ओलांडले आहे.
इथेनॉल पुरवठा वर्ष 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी, सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात इथेनॉल मिश्रणाविषयीचा विस्तृत आराखडा, इथेनॉल निर्मितीसाठी फीडस्टॉकचा विस्तार; इथेनॉलचे पेट्रोलसोबत मिश्रण कार्यक्रमांतर्गत इथेनॉलच्या खरेदीसाठी लाभदायी मूल्य; इथेनॉलचे पेट्रोलसोबत मिश्रण कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा कराचा दर 5% पर्यंत कमी, मिश्रणासाठी राज्यभरात इथेनॉलच्या मुक्त वाहतुकीसाठी उद्योग (विकास आणि नियमन ) कायद्यात सुधारणा,देशात इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व्याज अनुदान योजना, इथेनॉल खरेदीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांकडून नियमितपणे स्वारस्य अभिव्यक्ती जारी करणे, यांचा समावेश आहे.
ही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.