इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विनेश तु चॅम्पियन आहेस. ज्या जिद्दीने तु खेळाच्या मैदानाबाहेर आणि मॅटवर लढलीस त्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. कोणत्याही
खेळाडूला पदक जिंकण्येपेक्षा खेळाचा आनंद जास्त असतो. कारण पदक ही फक्त मोहोर असते परंतु कितीही वेळा हार पत्करावी लागली तरी पुन्हा नव्या जोमाने जो रिंगणात उतरतो, तोच खरा खेळाडू असतो असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनेशचे कौतुक केले आहे. तर पुढे त्यांनी सत्ताधा-यांवर निशाणा सुध्दा साधला आहे.
आव्हाड पुढे म्हणाले की, आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात तू रस्त्यावर उतरून लढा दिलास. इथल्या व्यवस्थेने तो चिरडण्याच प्रयत्न केला. पण तरिही तू हार मानली नाहीस. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी पात्र ठरलीस आणि जागतिक क्रमवारीतील पहिल्या स्थानवर असलेल्या खेळाडूला चितपट केलंस, तिथेच तुझा विजय झालेला. पुढची मॅच फक्त क्रमांक निश्चित करण्यासाठी होती. पण प्रस्थापितांना तेसुद्धा पाहावलं गेलं नाही, याचं असंख्य भारतीयांना आश्चर्य वाटलंच आहे पण त्याहीपेक्षा प्रचंड चीड आली आहे.
कुस्तीला अलविदा करण्याचा तुझा निर्णय नक्कीच स्वागतार्ह नाही. कारण या देशाला तुझ्यासारख्या लढवय्या खेळाडूंची गरज आहे. तु म्हटल्याप्रमाणे कुस्तीचा नक्कीच विजय झालाय आणि तो तुझाही विजय आहे. हा देश तुझ्यासोबत आहे, तु हिम्मत हरू नकोस. आम्हाला तुझा अभिमान होता आणि कायम राहिल.









