नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात घरफोडींची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुवनगर भागात राहणारे शरद अनाजी कडाळे (रा.मयुरेश्वर पार्क गणपती मंदिराजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कडाळे कुटूंबिय मंगळवारी (दि.६) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली २ लाख ७० हजाराची रोकड व सुमारे १ लाख २० हजार ३७५ रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे असा ३ लाख ९० हजाराचा ऐवज चोरून नेला.
याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर भागात घडली. ज्ञानोबा रूपला पवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार कुटुंबिय रविवारी (दि.४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली दहा लाख ४० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १४ लाखाचा ऐवज चोरून नेला. याबाबत अबंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.