नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी एका बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. लिंकद्वारे अप्लीकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडून भामट्यांनी बँक ग्राहकाच्या खात्यातील ७ लाख ११ हजाराची रोकड परस्पर दुस-या खात्यात वर्ग करून लांबविली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय राजेश मेश्राम (रा.सुभाषरोड,ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मेश्राम यांच्याशी गेल्या २० जुलै रोजी संपर्क साधण्यात आला होता. ९१९५९२०८३३२२ या मोबाईल धारकाने त्यांच्याशी संपर्क साधत युनियन बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला होता. यावेळी मेक्षाम यांना विश्वासात घेत संशयिताने एक लिंक पाठवून आधारकार्ड अपडेट युनियन बँक – एपीके हे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
या काळात मेश्राम यांच्या मोबाईल फोनचा अॅक्सेस घेत भामट्याने ऑनलाईन बँकिगच्या माध्यमातून त्यांच्या युनिटन बँकेच्या नाशिकरोड शाखेतील बचत खात्यातून ३ लाख ९१ हजार व कार्पोरेशन बँकेच्या बचत खात्यातील ३ लाख २० हजार रूपये अशी ७ लाख ११ हजाराची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतली. याबाबत संदेश प्राप्त होताच मेश्राम यांनी बँक व्यवस्थापन आणि पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.