पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनचे १ लाख १४ लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना बँकांनी ८ हजार ३२० कोटी रुपये व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे; त्यापैकी महामंडळाच्यावतीने ८३२ कोटी रुपयांचा व्याज परतावा केला आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन खोजे यांनी दिली आहे.
महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभ देऊन महांमडळाकडून १ लाख उद्योजक तयार करण्याची संकल्पपूर्ती केली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सत्कार केला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले असे यावेळी सांगितले.
मराठा समाजाची आर्थिक प्रगती करण्याकरीता तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुर्नरचना केली. महामंडळाच्या जून्या योजना बंद करुन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले. महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर श्री. पाटील यांनी राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा केला. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मराठा तरुण-तरुणींना उद्योजक होण्याकरीता प्रोत्साहित केले. उद्योजकाला राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी बँकेसोबत बैठका घेतल्या. समाजातील युवकांना उद्योगाच्याअनुषंगाने मार्गदर्शन करुन उद्योजकांच्या प्रवाहात सामील करुन घेतले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी विविध खात्याचे मंत्री, लोकप्रतिनिधी, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेचे प्रमुख, लाभार्थी यांनी महांमडळाला केलेल्या सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.