नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळय़ा भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून भामट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडवर डल्ला मारला. याप्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धात्रकफाटा परिसरात राहणा-या चेतना उमेश भाबड (रा.निलकंठ अपा.महालक्ष्मीनगर) यानी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भाबड कुटुंबिय रविवारी (दि.४) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बस्ते करीत आहेत.
दुसरी घटना चेहडी पंपीग भागात घडली. किशोर रामनाथ बोराडे (रा.मराठा कॉलनी,जुना चेहडीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोराडे कुटुंबिय सोमवारी (दि.५) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात डब्यात ठेवलेली ४ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७९ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.