नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम साईटवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना मखमलाबाद शिवारातील तांबेमळा भागात घडली होती. जखमीवर गोंदीया येथे उपचार सुरू होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामचंद सुखलाल भोई (४५ रा.धानोरी ता.सालेकसा जि.गोंदीया) असे मृत मजूराचे नाव आहे. भोई गेल्या ३ जुलै रोजी सकाळच्या सुमारास तांबे मळा येथील गॅस गोडावून भागात सचिन कुटे यांच्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली होती. काम करीत असतांना बांधकामाच्या दहा फुटावरून तो जमिनीवर कोसळला होता.
या घटनेत त्याच्या छातीस व मणक्यास गंभीर दुखापत झाल्याने बिल्डर कुटे यांनी त्यास पाथर्डी फाटा येथील वक्रतुंड रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यास गोंदीया येथील केटीएस रूग्णालयात हलविण्यात आले होते. १७ जुलै रोजी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला असून याबाबत डॉ. रोहन पांडे यानी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.