नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारने ४ मे २०२४ पासून कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेतली असून, ५५० डॉलर्स (USD) प्रति मेट्रिक टन किमान निर्यात दर (MEP) आणि ४० टक्के निर्यात शुल्कासह निर्यातीला परवानगी दिली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ३१ जुलै २०२४ पर्यंत देशाची एकूण कांदा निर्यात २.६० लाख टन इतकी झाली. त्याशिवाय, कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठीचा साठा (बफर) म्हणून, सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (NCCF) आणि नाफेड (NAFED), अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघा मार्फत महाराष्ट्रातून ४.६८ लाख टन कांदा खरेदी केली होती.
मागील वर्षाच्या (२०२३) तुलनेत चालू वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळाला. एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील बाजारपेठेत कांद्याचे सरासरी मासिक दर रु. १,२३० ते रु. २,५७८ प्रति क्विंटल इतके होते. मागील वर्षी (२०२३), याच कालावधीत ते रु. ६९३ ते रु. १,२०५ प्रति क्विंटल इतके होते. चालू वर्षात बफरसाठी कांदा खरेदीचा सरासरी दर रु.२,८३३ प्रति क्विंटल होता. मागील वर्षाच्या रु.१,७२४ प्रति क्विंटलच्या खरेदी दरापेक्षा तो ६४ टक्के जास्त आहे.
भारत हा प्रमुख कांदा निर्यातदार देश असून, तो निर्यातीमधून उत्पन्न मिळवतो. गेल्या तीन वर्षांत भारताने कांदा निर्यातीमधून मिळवलेले एकूण उत्पन्न २०२१-२२ मध्ये रु.३,३२६.९९ कोटी, २०२२-२३ मध्ये रु.४,५२५.९१ कोटी आणि २०२३-२४ मध्ये रु.३,५१३.२२ कोटी इतके होते.