मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरातमध्ये ईडीचे अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकलेले असल्याची चर्चा असतांना महाराष्ट्रात ‘ईडी’ अधिकारी असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
एका अज्ञात व्यक्तीने ‘ईडी’चे अधिकारी म्हणून सांगत ’मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात आरोप असलेल्या अनिल भोसले यांच्या पत्नीकडून १५ कोटींची मागणी केली. त्याने ‘ईडी’ अधिकाऱ्याचे एक पत्र आणि बनावट ओळखपत्र बनवले होते. भोसले यांच्या पत्नी रेश्मा यांना त्यांनी ते पाठवले. पुणे येथील सहकारी बँकेच्या फसवणुकीप्रकरणी ‘ईडी’ने दोन वर्षांपूर्वी भोसले यांना अटक केली. ते अजूनही तुरुंगात आहेत. भोसले यांना मदत करण्याचे आश्वासन तोतयाने भोसले यांच्या पत्नीशी संपर्क साधून दिले. त्यासाठी १५ कोटी रुपयांची मागणी केली.
भोसले यांच्या पत्नीने ‘ईडी’ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा अधिकारी तोतया असल्याचे उघडकीस झाले. त्यानंतर ‘ईडी’ने वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ईडीच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.