इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नई – हरियाणामध्ये फार्मा कंपनीने दिवाळी भेट म्हणून चारचाकी दिली तर तामिळनाडूमध्ये एका चहा उत्पादक कंपनीने थेट किंमती दुचाकी कर्मचा-यांना भेट दिली. त्यामुळे ही गाड्यांच्या भेटीचा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे. तर दुसरीकडे अनेक कंपन्याची ती डोकेदुखी ठरली आहे. सर तुम्ही का असे करत नाही असे शब्द आता कंपनीच्या मालकांच्या कानावर पडू लागले आहे.
खरं तर दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना विविध भेटवस्तू देत असतात. दिवाळीनिमित्त विविध कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. अनेक कंपन्या किंवा संस्थांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिठाई, फटाके, कपडे, प्रोत्साहन भत्ता देतात. काही कर्मचाऱ्यांना मिळालेल्या भेटवस्तूमुळे त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ येते. असेच उदाहरण तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात झाले आहे. कोटागिरी गावातील चहा उत्पादक कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना रॉयल एनफिल्ड कंपनीच्या दुचाकी गाड्या दिवाळी बोनस म्हणून देत आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या चहा उत्पादक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या गिफ्टची कल्पना केली नव्हती. कोटागिरी गावातील या कंपनीने १५ रॉयल एनफिल्ड दुचाकी कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून भेट दिल्या आहेत. एका रॉयल एनफिल्डची किंमत साधारणपणे दोन लाख रुपयांच्या आसपास आहे. अशी आगळीवेगळी भेट देणाऱ्या पी. शिवकुमार यांचा १९० एकरावर चहाचा मळा आहे.
दरवर्षी ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून घरगुती उपकरण किंवा रोख रक्कम देत असतात; मात्र या वर्षी त्यांनी चांगली कामगिरी करणाऱ्या १५ कामगारांना बुलेट भेट दिल्या आहेत. या चहा उत्पादक कंपनीत ६२७ कर्मचारी काम करतात. त्यापैकी व्यवस्थापक, पर्यवेक्षक, भांडारपाल, कॅशिअर, चालकांना दुचाकी भेट दिल्या आहेत.