नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– माजी नगरसेविका डॉ. ममता शैलेंद्र पाटील यांच्या राका कॉलनीतील घरातून चोरट्यांनी एक कोटीहून अधिक किमतीच्या सोन्याचांदीच्या आणि हिरेजडीत दागिणे लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.६) पाटील कुटुंबिय धुळे येथे नातेवाईकांकडे गेले असता ही घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तिस-या मजल्यावर राहणा-या डॉ. पाटील यांच्या घराचे लोखंडी ग्रील आणि दरवाजा तोडत ही घरफोडी केली. विशेष म्हणजे या फ्लॅटभोवती लोखंडी ग्रीलची सुरक्षेसाठी लावण्यात आलेली आहे. तसेच उंबरठ्यावरच उजव्या कोप-यात सीसीटीव्ही कॅमेराही बसविण्यात आला आहे. चोरांनी लोखंडी ग्रील तोडल्यानंतर मुख्य लाकडी दरवाजाचे कुलुप तोडून लाकडी उंबरा फोडून आतमध्ये प्रवेश केला.
बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटांची तोडफोड करत त्यामध्ये असलेले सोन्याच्या दागिण्यांसह हिरेजडीत एकापेक्षा अधिक मंगळसुत्र, एक ते दीड लाख रूपयांची रोकड, काही विदेशी चलन असा सुमारे एक कोटी रूपयांचा ऐवज या घरफोडीत चोरांनी लांबविल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त होत आहे. सकाळी साफसफाई साठी आलेल्या कामगाराच्या ही बाब निदर्शनास आल्याने या घटनेचा उलगडा झाला. दोन्ही दरवाजे उघडे दिसल्याने कामगाराने डॉ. पाटील कुटुंबियास आवाज दिला मात्र कुठलाही प्रतिसाद आला नाही, तेव्हा त्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकास याबाबत माहिती दिली.
यानंतर पाटील कुटुंबियांना घटनेची माहिती कळविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, पोलीस निरिक्षक सुरेश आव्हाड, मधुकर कड आदींसह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी याप्रकरणी फियार्दी डॉ. शैलेंद्र पाटील यांनी दिलेल्या फियार्दीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.