नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईनाका व इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यात अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरात रिक्षा चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एक मुलगा हाती लागल्याने चोरीच्या दोन रिक्षा पोलीसांनी हस्तगत गेल्या. या चोरीचा मास्टरमाईंड अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.
पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांच्या आदेशान्वये शहर पोलीसांनी वाहन चोरीवर लक्ष केद्रीत केले आहे. पोलीस यत्रणा चोरट्यांच्या मागावर असतांना विशेष पथकाचे कर्मचारी रविंद्र दिघे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रिक्षाचोरीच्या दोन घटनांचा उलगडा झाला. रवी शंकर मार्गावरील वडाळा जॉगिंग ट्रॅक भागात एक चोरटा येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.५) सायंकाळी पोलीसांनी सापळा लावला असता अल्पवयीन मुलगा पोलीसांच्या हाती लागला. संशयिताने मास्टर माईंड असलेल्या तौफिक शहा (रा.लिली व्हाईट स्कुल जवळ,वडाळागाव) याच्या सांगण्यावरून मंबईनाका व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन अॅटोरिक्षा चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात त्याने एमएच १५ एके ५१४६ काढून दिली असून सदरची रिक्षा मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आली आहे. तसेच मुलाच्या सांगण्यावरून इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली दुसरी रिक्षाही पथकाने हुडकून काढली आहे. अल्पवयीन मुलांना प्रलोभन दाखवून चोरी करण्यास भाग पाडणा-या तौफिक शहा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे व इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड,पोलीस नाईक योगेश चव्हाण,रविंद्र दिघे,दत्तात्रेय चकोर,मंगेश जगझाप अंमलदार भगवान जाधव,गणेश वडजे,मंगला जगताप,सविता कदम,अरूण परदेशी मुश्रीफ शेख, योगेश जाधव आदींच्या पथकाने केली.