इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं चौथं पदक निश्चित करत कुस्तीपटू विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेजचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताला विनेशकडून सुवर्ण पदकाची आशा निर्माण झाली आहे. विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.
तिच्या या य़शानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत तीचे कौतुक केले असून केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना एकाच दिवसात पराभूत केल्याने आज विनेशसह संपूर्ण देश भावूक झाला आहे. ज्यांनी विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांचा संघर्ष खोटा ठरवला आणि त्यांच्या हेतूवर आणि क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले, त्यांना उत्तरे मिळाली आहेत.
आज भारताच्या शूर कन्येसमोर तिला रक्ताचे अश्रू ढाळणारी संपूर्ण सत्ता गडगडली आहे, हीच चॅम्पियनची ओळख आहे, ते मैदानातूनच उत्तर देतात. विनेशला खूप खूप शुभेच्छा. पॅरिसमधील तुमच्या यशाची प्रतिध्वनी दिल्लीपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत आहे.