इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) महादेव बुक आणि Reddyannaprestopro यासह २२ बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांना ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. सक्त वसूली संचालनालयाने, बेकायदेशीर बेटिंग ॲप्स सिंडीकेटच्या विरोधात केलेल्या तपासानंतर छत्तीसगडमधील महादेव बुकवर छापे टाकून या ॲपच्या बेकायदेशीर कारवाया उघडकीस आणल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महादेव बुकचा मालक सध्या कोठडीत असून त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 च्या कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
“छत्तीसगड सरकारला कलम ६९A IT कायद्यानुसार संकेतस्थळ किंवा अॅप बंद करण्याची शिफारस करण्याचे सर्व अधिकार आहेत, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. मात्र, छत्तीसगड सरकारने तसे केले नाही किंवा गेल्या दीड वर्षांपासून या संदर्भात चौकशी सुरू असताना देखील राज्य सरकारने तशी विनंतीही केली नाही.
खरे तर या संदर्भात सक्त वसुली संचालनालयाकडून पहिली आणि एकमेव विनंती प्राप्त झाली आहे आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असेही राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. छत्तीसगड सरकारला अशी विनंती करण्यापासून कोणीही रोखले नव्हते, असेही ते म्हणाले.