नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सैनिकी शिक्षणात अग्रेसर असलेल्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने आपल्या वृक्षवेल्लींनी नटलेल्या भोसला कॅम्पस
ला अधिक हरीत(इको-फ्रेंडली),जैवविविधता व पर्यावरणपुरक बनविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. संस्थेचा हाच सकारात्मक दृष्टीकोन लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट अँथॉरिटी (जेएनपीए) ने आपल्या सामाजिक दायित्वाच्या(सीएसआर) भावनेतून संस्थेस या कामासाठी ५० लाखांची मदत दिली असून उभयतांमध्ये सोमवारी(ता.५) तसा करारही झाला आहे. या मदतीमुळे हे काम अधिक वेगाने मार्गी लागेल,असा विश्वास संस्था पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वृक्षवेल्लींनी नटलेला भोसलाचा १६५ एकरचा भव्य कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निसर्गांच्या सानिध्यात शिक्षण घेत असल्याची अनुभूती यावी, या उद्देशाने संस्थेतर्फे वृक्षतोडीऐवजी वृक्षारोपणाद्वारे झाडे जतन करण्याचा, हिरवळ वाढविण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे, त्यादृष्टीने कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम,सोहळ्यानिमित्ताने येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेशाचे प्रमाणपत्र दिले जाते. २६ जानेवारी,१५ऑगस्ट,कारगिलदिन,पर्यावरण दिनी सुध्दा युनिटकडून विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविले जातात. कॅम्पसमध्ये असणारी हिरवळ टिकविण्याचा प्रयत्न संस्था नेहमीच इतर युनिटद्वारे करते.
आगामी काळात जैवविविधता प्राप्त करून देणारी तसेच भविष्यात उपयोगी ठरतील, पशुपक्षांचा वावरही या कॅम्पसमध्ये वाढेल,अशा स्वरूपाची झाडे लावण्याचा, पर्यावरण पुरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेकडून व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भोसला कॉलेजने नुकतीच राममंदीराच्या परिसरात २०० फळे-फुलांच्या झाडांचे वृक्षारोपन करत ही सुरवात केली आहे.
निसर्गाच्या सानिध्यात संस्कारक्षम,पर्यावरण पुरक शिक्षण
विद्यार्थ्यांना संस्कारक्षम,शिस्तबध्द शिक्षण मिळावे त्याचप्रमाणे त्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षणाची अनुभूती यावी, यासाठी संस्था आणि सर्व युनिटचा प्रयत्न राहिला आहे, त्यासाठी संस्थेने देखील आपल्या अंदाजपत्रकात मोठी तरतूद केलेली आहे. सीएचएमई आणि जेएनपीएदरम्यान झालेल्या करारामुळे हे काम अधिक वेगाने पुढे जाईल, यासाठी जेएनपीचे संचालक उन्मेष वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे यांच्याकडे ५० लाखांचा धनादेश सुपुर्द केला, यावेळी जेएनपीएच्या प्रशासकीय सरव्यवस्थापक मनिषा जाधव,चेअरमन सुबोध आव्हाड,सीएसआर कन्सलंटंट सिध्दार्थ उघाडे, संस्थेचे सहकार्यवाह माधव बर्वे, नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष राहुल वैद्य उपस्थित होते, या सर्वांच्याच उपस्थित करारनामा करण्यात आला. भविष्यात दोन्ही संस्थांनी एकत्र येत हातात घालून असेच काम करण्याचा मनोदय व्यक्त केला.