नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने, 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजनेची जलद गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी दिले आहेत. ईएलआय योजना आणि त्याच्या अंमलबजावणी आराखड्याचा आढावा घेताना डॉ.मांडविया यांनी हे नमूद केले.
ईएलआय योजनेचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी मजबूत यंत्रणेच्या महत्त्वावर डॉ. मांडविया यांनी भर दिला.”आपले प्रयत्न शाश्वत आणि सर्वसमावेशक रोजगार परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने असणे अत्यावश्यक आहे.ईएलआय योजना ही रोजगार निर्मिती सुलभ करण्यासाठी तसेच नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे,”असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
देशात 2 वर्षांच्या कालावधीत 2 कोटींहून अधिक रोजगार निर्माण करणे हे ईएलआय योजनेचे उद्दिष्ट आहे.यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्यास आणि उपजीविका वाढविण्यात मोठा हातभार लागेल. ईएलआय योजनेच्या लाभांबाबत लोकांना,विशेषत:इच्छुक लाभार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी व्यापक संपर्क आणि जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
5 वर्षांच्या कालावधीत 4.1 कोटी युवकांना रोजगार,कौशल्यविकास तसेच इतर संधी सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय निधीसह पाच प्रमुख योजना आणि उपक्रमांची केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा करण्यात आली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे वरील योजनांच्या संपूर्ण तपशीलाला अंमलबजावणी आराखड्यासह अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरु आहे.