नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अंगावर पाणी उडविल्याचा जाब विचारल्याने दुचाकीस्वार त्रिकुटाने २६ वर्षीय युवकास मारहाण करीत त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना वावरे लेन भागात घडली. याघटनेत युवकास जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळक्याने त्याच्या हातावर चाकूचा हल्ला केल्याने तरूणाच्या डाव्या हाताच्या करंगळीस गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत भगवान हेमाडे (रा.दत्तनगर,पेठरोड) या युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हेमाडे रविवारी (दि.४) रात्री भद्रकालीतील वावरेलेन क्र.२ मधून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. सागर शुज दुकानासमोर तो उभा असतांना भरधाव वेगातील संशयिताच्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर पाणी उडाले. रस्त्यावरील डबक्यातील पाणी अंगावर उडल्याने हेमाडे याने आवाज देत दुचाकी हळू नाही चालविता येत का असा जाब विचारल्याने संशयितांनी शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यानी मारहाण केली.
यावेळी एकाने जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातील धारदारचाकूने हेमाडे याच्यावर चाकू हल्ला केला असून त्यात त्याच्या करंगळीस गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.