येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला-लासलगाव परिसरातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्यावतीने रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता माऊली लॉन्स, विंचूर रोड, येवला येथे हा रोजगार मेळावा होणार आहे. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला मतदारसंघातील युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांमधील ३ हजारहून अधिक पदांकरिता भरती होणार आहे. यामध्ये ५ वी पास ते पदवीधर, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, आयटीआय, फार्मसी, डॉक्टर, कृषी, इ. सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध असणार आहे. कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती सोबत स्टार्टअप व उद्योजकतेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन, विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या मेळावा प्रसंगी सहभागी झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्याच ठिकाणी मुलाखत घेऊन नियुक्तीपत्र देखील देण्यात येणार आहे.
या मेळाव्यात येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सदर https://tinyurl.com/56n7jzxh लिंक वर किंवा क्यूआर कोडवर आपण नोंदणी करू शकता असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अनिसा तडवी यांनी केले आहे.
……..