वायनाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रिलायंस फाउंडेशन केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन पीडितांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. रिलायंस फाउंडेशनने स्थानिक प्रशासनासोबत मिळून, आपत्ती ग्रस्त लोकांसाठी दीर्घकालीन मदतीचे नियोजन केले आहे. पीडितांना तातडीची मदत म्हणून अन्नपदार्थ, फळे, दूध, सुके राशन, स्वयंपाकाचे भांडे, पिण्याचे पाणी, मूलभूत स्वच्छता आवश्यक गोष्टी, तंबू, बिछाने, सोलर कंदील आणि टॉर्च अशा वस्तू फाउंडेशन उपलब्ध करून देत आहे.
प्रभावित कुटुंबांची जीवनमान सुधारण्यासाठी बियाणे, चारा, उपकरणे आणि सोबतच व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. रिलायंस फाउंडेशन मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पुस्तके आणि खेळ सामग्रीसह शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देईल. बचाव कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन टीम्सच्या कार्यक्षमतेसाठी रिलायंस जिओने विशेष टॉवर्स लावले आहेत, जेणेकरून संवाद सुधारेल आणि आपत्ती व्यवस्थापन सुरळीत होईल. फाउंडेशन मानसिक-सामाजिक आघाताने प्रभावित व्यक्तींना तज्ञांची मदत देखील देत आहे.
केरळमध्ये झालेल्या या दु:खद घटनेवर रिलायंस फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, “आम्ही वायनाडच्या लोकांच्या वेदना आणि भूस्खलनामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे दु:खी आहोत. या दु:खाच्या प्रसंगी, आमच्या संवेदना प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबासोबत आहेत जे बाधित झाले आहेत. आमच्या रिलायंस फाउंडेशनच्या टीम्स दिवस-रात्र काम करत आहेत. आम्ही या कठीण वेळी केरळच्या लोकांसोबत उभे आहोत.”
कंपनी वक्तव्या नुसार रिलायंस फाउंडेशनच्या टीम्स मदत सामग्रीसह घटनास्थळी उपस्थित आहेत. राज्य अधिकारी आणि स्थानिक प्रशासनासोबत सातत्याने चर्चा करत आहेत. प्रत्येक काम राज्य आणि इतर आपत्ती एजन्सीजसोबत समन्वय साधून लागू केले जात आहे जेणेकरून मदत वेळेत पोहोचेल. रिलायंस फाउंडेशन वायनाडच्या लोकांना दीर्घकालीन समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहे..