इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे गणेशोत्सवानिमित्त गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भरविल्यामुळे शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी हा घडलेला प्रकार धक्कादायक असून त्याची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई सुद्धा केली जाईल असे सांगितले आहे. पण, या कार्यक्रमाबाबत आयोजकांनी आरोपाचा इन्कार केला आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाल्याचे वृत्त हे निराधार असून सदर मैदान हे जिल्हा परिषद शाळेचे नसून ग्रामपंचायतीचे आहे. सदर मैदान संस्थेने रीतसर भाडे भरून परवानगी घेऊन तेथे कार्यक्रम घेतला आहे.
तालुक्यातील वलखेड या गावात एका गणेश मंडळाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील आवारात गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेत दिवसा शाळा झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास हा नृत्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. पण, आता हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी झेडपी शाळेत अशा कार्यक्रमांना परवानगी नसून सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात, मात्र सांस्कृतिक कार्यक्रम कोणते असावेत, याचे भान बाळगणे महत्त्वाचं आहे. मात्र असा काही कार्यक्रम झाला असल्यास हे धक्कादायक असल्याचे सांगितले. केसरकर यांनी स्थानिक गटशिक्षण अधिकारी यांनी चौकशी सुरु केली असून बीडीओच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. संबंधित चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान आयोजकांनी एक पत्रक काढून हा खुलासा केला असून त्यात हे मैदान जिल्हा परिषद शाळेचे नव्हते असे सांगितले.
एकता कला क्रीडा बहुउद्देशीय संस्था तर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या २३ वर्षा पासून गणेश फेस्टीवलचे आयोजन करण्यात येऊन विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहे. संस्थेस यापूर्वी जिल्हा ग्रामीण पोलीस तसेच विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. मंगळवार दि. २७) रोजी सायंकाळी ग्रामपंचायत मालकीचे खुल्या मैदानात भाडेपट्टा भरत रीतसर परवानगी घेऊन कलावंत गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत आयोजन केला होता.
महाराष्ट्रात प्रथमच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या व कोणतीही हुल्लडबाजी गोंधळ न होता कार्यक्रम संपन्न झाला मात्र एका वृत्तवाहिनीवर सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले सदर वृत्त हे निराधार असुन सदर मैदान हे जिल्हा परिषद शाळेचे नसून ग्रामपंचायतीचे आहे. सदर मैदान संस्थेने रीतसर भाडे भरून परवानगी घेऊन तेथे कार्यक्रम घेतला आहे. तसेच सदर शाळा सिग्राम कंपनीने दत्तक घेतल्याचे वृत्त हे निराधार असुन ग्रामपंचायतने सदर कंपनीचे सीएसआर फंडातून सदर शाळा बांधली आहे. तसेच सदर शाळा ही मैदानाचे मागील बाजूस असुन शाळा आवारापासून बरेच अंतर पुढे ग्रामपंचायत खुले मैदानात कार्यक्रम झाला आहे. तरी सदरहू वृत्त हे चुकीच्या माहितीचे आधारावर असुन त्यात काही तथ्य नाही असा खुलासा एकता कला क्रीडा बहुउद्देशीय संस्था वलखेड चे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केला आहे