इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या हव्यात यात जातीचा मुद्दा कुठे येतो. आज खाजगीकरण मोठं आहे, आणि खाजगी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आरक्षणाने खरंच शिक्षणातील असो की नोकऱ्यातील असो किती लोकांना फायदा होणार आहे याचा विचार आपण करणार आहोत का ? इथं फक्त माथी भडकवण्याचं काम सुरु आहे, इथे फक्त मतांचं राजकारण सुरु आहे हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे आपल्याला यांच्या मतांच्या राजकारणासाठी मूर्ख बनवलं जात आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुलामुलींना आपल्याकडच्या शिक्षणसंस्थांमध्ये ऍडमिशन्स मिळतात, पुढे त्यांना नोकऱ्या मिळतात. पण आपल्या मुलांना मिळत नाहीत, यावर कोणी बोल्ट नाहीत. जातपात शाळा-कॉलेजच्या पातळीवर पोहचलं. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीपातीत अडकला आहे असे सांगित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला.
ते म्हणाले की, माध्यमांवर आणि सोशल मीडियावर कशालाही प्रसिद्धी मिळते हे कळलं की वाट्टेल बोललं जातं हे थांबलं पाहिजे… आणि माध्यमांनी सुजाण भूमिका घेऊन ही असली चिखलफेक दाखवणं थांबवलं पाहिजे. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये असं जर पवारसाहेबांना वाटत असेल तर त्यांनी पण स्वतः त्याला हातभार लावू नये.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माझा नरेंद्र मोदींना पाठींबा आहे हे मी स्पष्ट केलं होतं, तेंव्हा मी कधीच विधानसभेचं बोललो नाही.
कोण कुठल्या मतदारसंघात उभं आहे याच्याशी मला देणंघेणं नाही. वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असेल. या महाराष्ट्रात इतक्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, त्या काय होत आहेत तर बाहेरून येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाव्यात म्हणून… सरकारला अफाट पैसे पायाभूत सुविधांवर खर्च करावे लागतात ते सुद्धा का? तर लोंढ्यांनी शहरांची पार वाट लावून टाकली आहे, मग त्यावर उपाय म्हणून एका मागोमाग एक प्रकल्प उभे करावे लागतात, आणि यांत मग ग्रामीण भागाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं.
देशातील सगळ्यात मोठं स्टेडियम उभं करायचं गुजरातमध्ये, ऑलिम्पिक स्पर्धा भरवायच्या आहेत गुजरातमध्ये … असं कसं चालेल? अर्थसंकल्पात खेळांसाठी तरतूद करताना सगळ्यात जास्त तरतूद गुजरात आणि उत्तरप्रदेशसाठी… असं का ? या देशाच्या पंतप्रधानांना सगळी राज्य समान हवीत ना… उद्या मराठी पंतप्रधान झाला आणि समजा त्यांनी सगळं महाराष्ट्रात सुरु केलं तर मी त्यांना हीच आठवण करून देईन की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात म्हणून
माझ्या पक्षाला या विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल. माझा पक्ष जन्माला येऊन १८ वर्ष झाली. आणि चढउतार कोणालाच चुकले नाहीत… काँग्रेस पक्ष ४४ खासदारांवर आलाच होता ना… अजून बोलायला मी सुरुवात नाही केली, मी जेंव्हा बोलायला सुरु करेन तेंव्हा बघू कोण कोण बोलतंय. आणि मी सध्या बोलत नाहीये कारण अजून तशी वेळ आलेली नाही, पण जेंव्हा मी बोलेन तेंव्हा ते त्यांच्या लक्षात राहील असं बोलेन.
लाडकी बहीण, लाडका भाऊ, करण्यापेक्षा लाडका मतदार योजना सुरु करा… संविधान बदलणार हे भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला, म्हणजे त्यांनीच विरोधकांना नरेटीव्ह दिलं ना? तोपर्यत चर्चाच नव्हती. म्हणजे भाजपनेच नरेटिव्ह दिलं ना…मी निवडणुकासांठी सर्व्हे करण्यासाठी एजन्सी घेतली नाही. माझ्या पक्षाचे लोकं दोनदा महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये जाऊन आले, तिथे लोकांना भेटून आलेत. त्यांनी त्यांचं म्हणणं माझ्याकडे मांडलं…धारावीतील स्क्वेअर फुटाचा दर काय आहे हे जर तुम्ही बघितलंत तर तुम्हाला कळेल की धारावी पुनर्विकासा भोवती काय राजकारण सुरु आहे.