चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500/- रुपये याप्रमाणे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्टनंतरही ही योजना सुरू राहणार आहे, त्यानुसार पात्र महिलांना 1500/- रुपये दरमहा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंदनसिंग चंदेल, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. राजूरकर, प्रा. अतुल देशकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे 2 लक्ष 84 हजार 923 अर्ज आले असून 2 लक्ष 11हजार 326 अर्जाची तपासणी झाली आहे. यापैकी 1 लक्ष 87 हजार 463 अर्ज मंजूर झाले असून त्रुटी पूर्ततेत 23718 अर्ज आहे. पूर्तता झाल्यावर सदर अर्ज मंजूर करण्यात येतील. तसेच दोन दिवसात संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.